भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरातील काशिमीरा चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत आगामी महासभेत चर्चा होणार आहे. यावेळी पुतळ्याची दुरुस्ती करावी अथवा तो अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या प्रवेशद्वारावर काशीमिरा चौकात साधारण तीन दशकांहून अधिक जुना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. हा पुतळा चौकाच्या मध्यभागी स्थित आहे.दरम्यान, मागील काही वर्षांत शहराचा झपाट्याने विकास झाल्यामुळे मेट्रो आणि नव्या उड्डाणपुलांच्या उभारणीचा निर्णय शासनाने घेतला. पुतळा जुना असल्यामुळे तो तेथून हटवण्यास शिवप्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे पुतळ्याभोवतीच मेट्रो आणि उड्डाणपूल उभारण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. तसेच शहराची ओळख कायम राहावी, यासाठी घोडबंदर येथील चौकात महाराजांचा भव्य पुतळा उभारून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, काशिमीरा येथे नुकतीच मेट्रो सेवा सुरू करण्यात आली असून उड्डाणपुलाचे कामदेखील सुरू आहे. परिणामी, या कामांमुळे पुतळा स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे पुतळ्याबाबत निर्णय घेण्यासाठी आगामी महापालिकेच्या महासभेत विषय मांडण्यात आला आहे. विषय पत्रिकेत हा मुद्दा असला तरी लोकप्रतिनिधींना यासंदर्भात सविस्तर गोषवारा देण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी तज्ञ सल्लागार व मूर्तिकार नेमण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामादरम्यान पुतळा काढल्यानंतर तो पुन्हा त्याच ठिकाणी बसवावा की अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी पक्षाच्या बहुमतामुळे हा पुतळा येथून हटवण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.