भाईंदर : मिरा-भाईंदरमधील महापालिकेच्या नव्या नाट्यगृहाची वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेले व्यावसायिक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. यामुळे प्रेक्षकांकडून महापालिका प्रशासनाच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त करण्यात आला. दहिसर चेक नाक्याजवळ महापालिकेने लता मंगेशकर नाट्यगृहाची उभारणी केली आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून, त्यासाठी प्रशासनाचा जवळपास शंभर कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

विकासकाला विकास हक्क प्रमाणपत्र देऊन त्याबदल्यात या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांपासून या नाट्यगृहात अनेक व्यावसायिक नाट्यप्रयोग आणि खासगी कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडत आहे. मात्र, दुसरीकडे नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी या नाट्यगृहात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्थेमार्फत गणेश दर्शन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळीही वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे समोर आले.

त्यानंतर प्रसिद्ध संगीतकार अमित टंडन यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून पैसे भरून जागा आरक्षित केली होती. मात्र, ऐनवेळेपर्यंत वातानुकूलित यंत्रणा सुरू न झाल्याने आयोजकांनी कार्यक्रम रद्द करून प्रेक्षकांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.महत्त्वाची बाब म्हणजे, या यंत्रणेची दुरुस्ती सातत्याने करण्यात येत आहे. शनिवारीच यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, गॅस गळती झाल्याने यंत्रणा पुन्हा बंद करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

परिवहनमंत्र्यांकडून संताप

रविवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्थेमार्फत नाट्यगृहात गणेश दर्शन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते. मात्र, यावेळी वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी, चांगल्या वास्तूची देखभाल होत नसेल तर आयुक्त आणि महापौरांना ‘मनी ऑर्डर’ पाठवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.

कंत्राटदार वेतनाच्या प्रतीक्षेत

नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने विविध कामांसाठी कंत्राटदार नेमले आहेत. निविदा प्रक्रिया राबवून ही कामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. मात्र, यातील कंत्राटदारांना मागील एक वर्षापासून देयकेच मिळाली नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, त्याचा परिणाम देखभाल-दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर होऊ लागला आहे.