भाईंदर :- भाईंदरमध्ये नागरी वस्तीत घुसून हल्ला करणाऱ्या बिबट्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसह एका स्थानिक नागरिकाचा महापालिकेमार्फत सत्कार करण्यात आला आहे.

साधारण सहा महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात भाईंदर पूर्वेतील तलाव रोड परिसरात नागरी वस्तीत अचानक बिबट्या आढळून आला होता. या घटनेत बिबट्याने एका घरात घुसून कुटुंबीयांवर हल्ला केला होता. त्यात एका तरुणीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर बिबट्या परिसरात सैरावैरा पळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र बिबट्याला नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत होते. अखेर वन विभागाने सुमारे चार तास बचावकार्य राबवून बिबट्याला जेरबंद केले.

दरम्यान, या संपूर्ण घटनेदरम्यान अग्निशमन विभागातील जगदीश पाटील,भावेश भोगले तसेच स्थानिक नागरिक छगनलाल बागेचा यांनी धाडसाने पुढाकार घेत बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या धैर्यामुळे मोठी दुर्घटना टळली.या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापौर डिंपल मेहता यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत या सर्वांचा सत्कार करून गौरव केला.दरम्यान, पकडण्यात आलेल्या बिबट्याला वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सोडण्यात आले होते. मात्र, सुमारे महिनाभरापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.