भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात नवे महिला भवन उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी २९ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. यामुळे शहरातील हे दुसरे महिला भवन ठरणार आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेद्वारे शहरात महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यात महिलांना आर्थिक साहाय्य देण्यासह त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी चार वर्षांपूर्वी महापालिकेने मिरा रोड येथे महिला भवन उभारले होते. तत्कालीन महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर निवासाचे महिला भवनमध्ये रूपांतर केले होते. यासाठी प्रशासनानेदेखील कोट्यवधी रुपये खर्च केले होते. दरम्यान, या भवनमध्ये काम सुरू असतानाच आता नवे महिला भवन उभारण्याचा निर्णय महापौर डिंपल मेहता यांनी घेतला आहे.

यासाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या गोडदेव येथील सुविधा भूखंडाची जागा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी या जागेवर पालिका कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत उभारण्यात येणार होती. त्या अनुषंगाने बांधकामाचे कामदेखील करण्यात आले होते. मात्र, आता या ठिकाणी महिला भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जवळपास २९ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. पुढील खर्चासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आगामी महासभेपुढे प्रस्ताव सादर केला असून, त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

भवन उभारणीच्या नावावर उधळपट्टीचे आरोप

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे महिला भवन काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेच्या हाती देण्यात आल्याची बाब समोर आली होती. दरम्यान, आता पुन्हा दुसरे महिला भवन उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रामुख्याने महिला भवन उभारणीस विरोध केला जात नसला तरी शहरात अनेक मोकळ्या वास्तू उपलब्ध असतानाही नव्याने बांधकाम करून पुन्हा कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.