भाईंदर: मिरा-भाईंदर शहरासाठी मराठी महापौर द्यावा, या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीमार्फत आयोजित करण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी रोखला आहे. त्यामुळे आंदोलनकारी संतप्त झाले असून पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेवर महापौर पदासाठी एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या भाजप पक्षाने डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली आहे. मात्र यावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. शहरासाठी मराठी महापौर द्यावा, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. त्यासाठी मंगळवारी समितीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानातून महापालिका मुख्यालयाकडे जाणार होता.
मात्र या मोर्चामुळे समाजात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना आदल्या दिवशीच नोटीस बजावली होती. तसेच मोर्चाच्या ठिकाणी जाऊन काही आंदोलनकर्त्यांना सकाळीच ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सुरू असलेल्या वादातून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

