भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी बुधवारी आपल्या कार्यालयाचा ताबा घेत औपचारिकपणे पदभार स्वीकारला.महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपने दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड केली आहे.३ फेब्रुवारी रोजी सभागृहातील मतदान प्रक्रियेत ९५ पैकी ७९ मते मिळवत मेहता विजयी झाल्या होत्या.

निवडीनंतरही त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारलेला नव्हता. केवळ ४ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय बैठक घेत अधिकाऱ्यांशी कामाचा आढावा घेतला होता.दरम्यान बुधवारी सकाळी सुमारे नऊ वाजता मेहता यांनी विधिवत पूजा करून महापौर कार्यालयाचा पदभार स्वीकारला. या वेळी आमदार नरेंद्र मेहता, भाजप गटनेते हसमुख गेहलोत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण क्षमतेने राबवण्याचा निर्धार असल्याचे डिंपल मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप हा सेवा करण्याच्या भावनेतून राजकारण करतो. राज्यात मी आणि शहरात महापौर एकत्र काम करून शहर विकासाला गती देऊ, असे आमदार नरेंद्र मेहता यांनी यावेळी सांगितले.

१८ फेब्रुवारीला विस्तार

महापौर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १८ फेब्रुवारीला विशेष बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत स्थायी समितीचे सभापती व सदस्य, सभागृह नेते तसेच इतर पदांचे वाटप करून विस्तार केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी एकीकरण समितीचा विरोध कायम

मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपकडून मराठी व्यक्तीची निवड झाल्यामुळे मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. या संदर्भात समितीने आंदोलन केले होते. बुधवारी महापौर पदग्रहण सोहळ्याच्या वेळी काळे झेंडे दाखवून विरोध करण्याची रणनीती आखण्यात आली होती. मात्र पोलिसांनी मनाई केल्यामुळे ऐनवेळी समितीने माघार घेतली.महापालिकेचा संपूर्ण कारभार शंभर टक्के मराठी भाषेत चालवावा. हिंदी किंवा अन्य भाषेचा वापर झाल्यास थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.

मुहूर्त बघून काम:-

मिरा भाईंदर महापौर पदी निवड झाल्यानंतर तब्बल नऊ दिवसानंतर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारला. मिळालेल्या माहितीनुसार मधल्या दिवसात कोणताही मुहूर्त नसल्यामुळे त्यांनी ही दिरंगाई केली. तसेच मेहता यांचे कुटुंबीय अंक शास्त्र विद्येला मनात असून त्याच्या वाहनांवर तसेच इतर वास्तूला विशिष्ट असा ७११ नंबर देण्यात येतो.याच धर्तीवर ११ तारखेला त्यांनी पदग्रहण केले असल्याची चर्चा कार्यक्रमात रंगली होती. तर यावर अनेकांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली.