भाईंदर : अमराठी महापौर म्हणून मोठ्या प्रमाणात विरोध झालेल्या मिरा भाईंदर पालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढली. यावेळी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरा भाईंदर महापालिकेमार्फत दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यंदा जवळपास तीन वर्षांनंतर महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या महापौर व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात भाईंदर पश्चिम येथील पालिका मुख्यालयातून सकाळच्या सुमारास कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महापौरांच्या उपस्थितीत मुख्यालय ते नगरभवनपर्यंत ‘ग्रंथदिंडी’ काढण्यात आली.
यामध्ये पारंपरिक पोशाख परिधान करून महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी तसेच शालेय विद्यार्थिनींनी लेझीम सादर केली. त्यानंतर नगरभवनाच्या तिसऱ्या मजल्यावर इतिहास, विज्ञान, व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवरील मराठी पुस्तकांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले. याशिवाय शहरातील मराठी भाषिक संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून ‘मराठी भाषेचे’ महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मराठीच्या मुद्द्यावर महापौरांना होता विरोध :
मिरा भाईंदर महापालिकेवर भाजपकडून डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. स्थानिक मराठी भाषिक उमेदवार न देता मेहता यांची निवड केल्यामुळे मराठी एकीकरण समितीकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. यासाठी समितीने आंदोलन देखील पुकारले होते; मात्र पोलिसांनी हे आंदोलन शांत केले होते
