भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी बुधवारी सायंकाळी पालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना विविध कामांबाबत सूचना दिल्या.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांची निवड झाली आहे. दरम्यान, मेहता यांनी अद्यापही महापौर दालनाचा ताबा घेतलेला नाही. मात्र, त्यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी सायंकाळी त्यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला आयुक्त राधा बिनोद शर्मा, भाजप आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर ध्रुव किशोर पाटील, गटनेते हसमुख गेहलोत तसेच महापालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी सध्या सुरू असलेल्या महापालिकेच्या विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. यामध्ये सिमेंट रस्ते, अंतर्गत जलवाहिनी प्रकल्प, क्रीडा संकुल तसेच इतर कामांचा समावेश होता. याशिवाय मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल आणि इतर वास्तूंच्या लोकार्पणाच्या तारखा निश्चित करण्याबाबतही महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच शहरात सुरू असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती संकलित करून त्याचे सादरीकरण करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.

