भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदाची निवड करण्याचा दिवस उजाडला असतानाही महापौरांचे कार्यालय अद्याप सज्ज नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने ऐनवेळी कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे महापौरपदाच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदासाठी मंगळवारी (३ फेब्रुवारी) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी शासनाने पीठासीन अधिकारी म्हणून सौरभ कटियार यांची नियुक्ती केली आहे. भाजपने एकहाती म्हणजे ९५ पैकी ७८ नगरसेवक निवडून आणल्यामुळे त्यांनी दिलेले उमेदवार डिंपल मेहता हे महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी प्रशासनाने सभागृह सज्ज केले आहे.
मात्र दुसरीकडे, महापौरपदाची निवड उद्यावर येऊन ठेपली असताना पालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेले महापौर कार्यालय मात्र अद्याप तयार नसल्याचे समोर आले आहे. सध्या या कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून महापौराच्या खुर्चीसह इतर ठिकाणी साफसफाई न झाल्यामुळे धूळ पसरलेली आहे. त्यामुळे निवड झाल्यानंतर महापौरांना खुर्चीवर बसण्यापासून वंचित राहावे लागू शकते. यामुळे महापौरांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा उत्साह फिका पडण्याची तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाच्या कारभारावर नाराजी
मिरा-भाईंदर महापालिकेचे महापौरपद मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रशासनाने महापौर दालन सज्ज करून ठेवणे गरजेचे होते. मात्र, ऐनवेळी कार्यालयाचे काम हाती घेतल्याचे आरोप भाजप समर्थकांकडून करण्यात येत आहेत. तर महापौर कार्यालयाची प्राथमिक देखभाल-दुरुस्ती करण्यात आली असून नव्या महापौरांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

