भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेवर मराठी महापौर बसवण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रशासन धास्तावले आहे. त्यामुळे पालिकेत सुरू असलेली महापौर निवडणूक प्रक्रिया चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडली जात आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ९५ पैकी ७८ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानुसार भाजप पक्षाने डिंपल मेहता यांची महापौर म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. मंगळवारी महापौर पदासाठी औपचारिक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, महापालिकेवर मराठी महापौर बसवावा, यासाठी मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. भाजपकडे मागणी करूनही ती मान्य न झाल्यामुळे समितीने मंगळवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला आहे.

हा मोर्चा पालिकेवर येऊन धडकण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. महापौर निवडणुकीदरम्यान कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून पालिका मुख्यालयात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही आंदोलनकर्ता सभागृहात प्रवेश करू नये म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरूनच ठरावीक लोकांनाच प्रवेश दिला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे काही काळ नाराजीचे वातावरण पसरले होते.

मोर्चाला सुरुवात

मराठी एकीकरण समितीने आयोजित केलेला मोर्चा भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानापासून सुरू करण्यात आला. हळूहळू अनेक आंदोलनकर्ते यात सहभागी होत आहेत. हा मोर्चा पायी चालत महापालिका मुख्यालयावर येऊन धडकणार आहे. कोणतीही गडबड आढळल्यास थेट कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

फेटे लावून नगरसेवकांचा प्रवेश

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात प्रवेश केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी विशेष फेटे परिधान केले होते, तर काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाची शाल घातली होती.