भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपने दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली आहे. त्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून सौरभ कटीयार यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ३० जानेवारी रोजी यासाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले.
विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस शिवसेनेच्या एकत्रित मिरा-भाईंदर विकास आघाडीतर्फे महापौरपदासाठी रुबीना फिरोज आणि उपमहापौरपदासाठी वंदना पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपतर्फे महापौरपदासाठी डिंपल मेहता आणि उपमहापौरपदासाठी ध्रुव किशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेत एकूण ९५ नगरसेवक आहेत. त्यापैकी ७८ जागांवर भाजपने विजय मिळवला असून पक्षाला एकहाती बहुमत प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून येणे सहज शक्य होणार आहे.
दुसऱ्यांदा निवड
प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आलेल्या डिंपल मेहता या दुसऱ्यांदा महापौरपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये अडीच वर्षे महापौरपद भूषवले होते. तर उपमहापौरपदी सलग सहाव्यांदा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक ध्रुव किशोर पाटील हे जबाबदारी पाहणार आहेत.
मराठी एकीकरण समितीच्या भूमिकेकडे लक्ष :-
महापौरपदी मराठी उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी मराठी एकीकरण समिती व मनसेने केली आहे. मराठी उमेदवार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. २०१७ साली डिंपल मेहता यांच्या निवडीनंतरही आंदोलन झाले होते. त्यामुळे यंदाही शहरात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, डिंपल मेहता यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असून त्या महाराष्ट्रीयनच असल्याचा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
पक्षांतर्गत नाराजी
यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यामुळे अनेक अनुभवी महिला नगरसेविकांना आपल्या नावाची वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र हे पद पुन्हा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनीलाच मिळाल्याने भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

