भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेत मराठी भाषिक महापौर द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन महिन्यांनंतर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या असून त्यामध्ये भाजप पक्षाला एकहाती बहुमत मिळाले. त्यानंतर पक्षाने महापौरपदासाठी डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली. मात्र मेहता या मराठी भाषिक नसल्यामुळे मराठी एकीकरण समितीकडून त्यास विरोध करण्यात आला.
यासाठी ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेवेळी आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. मात्र शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती. तरीदेखील आंदोलनकर्ते भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ एकत्र जमून आंदोलन केले.
यावेळी घोषणाबाजी, नृत्य व वाद्य वाजवत त्यांनी भाजपच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. तसेच महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्नही केला.
या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, समाजात तणावाचे वातावरण निर्माण करणे आणि शासनाच्या आदेशाचे पालन न करणे या कलमांखाली समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख, कृष्णा जाधव, प्रमोद पोर्टे, हेमेंद्र भोईर आणि इतरांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या गुन्ह्याची माहिती संबंधितांना तत्काळ देण्यात आली नव्हती.
दरम्यान, दोन महिन्यांनंतर पोलिसांनी नोटिसा बजावल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, राज्यात मराठी भाषेसाठी आंदोलन करण्यासही बंदी घातली जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
