भाईंदर : जैन धर्मीयांचा पर्युषण पर्वाचा कालावधी सुरू होणार असल्यामुळे मिरा भाईंदर शहरात दोन दिवस मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ८ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर रोजी ही बंदी लागू राहणार आहे.
मिरा भाईंदर शहरात जैन समाजाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. येत्या ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान या समाजाचा पवित्र पर्युषण पर्व सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्युषण पर्वाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी आणि अखेरच्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी शहरात मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात शहरातील मांसविक्रीची दुकाने दोन दिवस बंद राहणार आहेत. नियम डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
प्रामुख्याने पर्युषण पर्वाच्या काळात मांसविक्रीवर दोन दिवस बंदी घालण्याचे निर्देश शासन तसेच उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे. यापूर्वी २०१५ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजपने पर्युषण पर्वाच्या कालावधीत आठ दिवस मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर नागरिकांच्या विरोधानंतर हा निर्णय प्रशासनाला मागे घ्यावा लागला होता.दरम्यान, आता पुन्हा भाजप सत्तेत असून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शहरात राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या जैन समाजासाठी पर्युषण पर्वाच्या काळात पुन्हा कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या पूर्वीप्रमाणे केवळ दोन दिवस मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची जाहिरात सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
“पर्युषण पर्वाच्या काळात ८ आणि १५ सप्टेंबर अशा दोन दिवशी मांसविक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.”विक्रम निराटले –पशुसंवर्धन अधिकारी ( मिरा भाईंदर महानगरपालिका)
