भाईंदर :- मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अनधिकृत जाहिरात फलक लावण्यास मिरा-भाईंदरच्या जागरूक नागरिकांनी विरोध केला आहे. या संदर्भात नागरिक एकवटले असून महापालिकेकडे सक्त कारवाई करण्याची मागणी करत आहेत.येत्या ३ एप्रिल रोजी दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार उपस्थित राहणार असल्याची निमंत्रणपत्रिका एमएमआरडीए प्राधिकरणाकडून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते शहरात येणार असल्याने पक्षाचे उत्साही कार्यकर्ते जागोजागी अनधिकृत जाहिरात फलक लावण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही असे प्रकार घडले असून झाडांना खिळे ठोकणे व वीज खांब विद्रूप करणे असे प्रकार समोर आले आहेत. प्रामुख्याने मिरा-भाईंदर शहरात अनधिकृत जाहिरात फलकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात २९ सप्टेंबर २०१८ रोजी महापालिकेने प्रशासकीय ठरावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत.
या संदर्भात समाजमाध्यमांवर मोहीम राबविण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
