भाईंदर :- दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सलग दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता ६ नव्हे तर ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ मधील दहिसर ते काशिगावपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला येत्या ३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रोचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम एमएमआरडीएतर्फे निश्चित करण्यात आला होता.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित राहणार होते. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि शहरात जाहिरात फलकही लावण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर मेट्रो उद्घाटनाचे श्रेय घेण्यावरून सत्तेत एकत्र असलेल्या भाजप–शिवसेना पक्षांमध्ये वादही निर्माण झाला होता.
दरम्यान, सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच लोकार्पणाची तारीख ३ एप्रिलवरून बदलून ६ एप्रिल करण्यात आली. मात्र आता पुन्हा दुसऱ्यांदा बदल करून ६ ऐवजी ७ एप्रिल ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.त्यामुळे आता येत्या ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मेट्रोचे लोकार्पण होऊन ती सेवेत दाखल होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकसत्तेला दिली आहे.
