भाईंदर : मिरा-भाईंदरमधील काशीगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्यासाठी बाधित झालेल्या जागेच्या मोबदल्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल पडताळणी करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. काशीगाव मेट्रो स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्यामुळे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांशी संबंधित सेव्हन इलेव्हन संस्थेची जागा बाधित होत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर संस्थेने आक्षेप घेतल्यामुळे एमएमआरडीएने जिन्याचे नियोजन बदलून तो लगतच्या नाल्यावर हलवला. मात्र, ती जागाही संस्थेचीच असल्याचा दावा करत काम पुन्हा थांबवण्यात आले.
या वादामुळे मेट्रोच्या कामाला विलंब होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून संबंधित जागेचे भू-संपादन करण्याचे आदेश महापालिकेला दिले. संस्थेने विकास हक्क प्रमाणपत्र स्वीकारण्यास नकार दिल्याने रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. यासाठी २४ कोटी २४ लाख रुपये इतके मूल्य निश्चित करण्यात आले असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे २००३ मध्ये महापालिकेने विकसित केलेल्या ४५ मीटर रस्त्यासाठी बाधित झालेल्या जागेचा मोबदला देण्याची प्रक्रिया यात आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर मोबदला का दिला जात आहे, यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच संबंधित जागा संस्थेने मागील काही वर्षांत खरेदी केली असल्याने या मोबदल्यावर त्यांचा दावा कसा ग्राह्य धरला जाऊ शकतो, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त लोकसत्तामध्ये ३० जून २०२६ रोजी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी या भू-संपादन प्रक्रियेची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्ता विकसित करण्यात आला त्यावेळचे मूळ जमीनमालक आणि सध्या मोबदल्याचा दावा करणारे जमीनमालक यांची कागदपत्रे तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात आमदार नरेंद्र मेहता यांना येत्या काळात धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“मेट्रोचे काम पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या जमीनमालकांनी मोबदल्याची मागणी केली असून त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष मोबदला देण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी केली जाईल. रस्ता विकसित करण्यात आला त्यावेळचे मूळ जमीनमालक तसेच सध्या संबंधित जागेतील सर्व मालकांची माहिती तपासून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.” राधा बिनोद शर्मा -आयुक्त ( मिरा-भाईंदर महानगरपालिका
