भाईंदर :- दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता लाईन ७ आणि लाईन ९ या संयुक्त मार्गिकेचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरकरांसाठी प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार असून, नव्या मेट्रोने प्रवास करण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ७ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी दोन वेळा उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. मात्र आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
या संयुक्त मार्गिकेमुळे गुंदवली ते काशिगाव या सुमारे १९.७९ किमी लांबीच्या मार्गावर एकत्रित सेवा सुरू होणार आहे. परिणामी अंधेरी पूर्व ते काशिगाव असा थेट प्रवास शक्य होणार असून, प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
मेट्रोची पहिली गाडी सकाळी सुमारे ५:५० वाजता सुटणार असून शेवटची गाडी रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. गर्दीच्या वेळेत दर ५ ते ६ मिनिटांनी तर इतर वेळेत ८ ते १० मिनिटांच्या अंतराने गाड्या धावणार आहेत.दररोजच्या फेऱ्यांबाबत बोलायचे झाल्यास, आठवड्याच्या दिवशी सुमारे २७६ फेऱ्या, शनिवारी २२३ तर रविवारी २०५ फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. एकूणच, या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे मिरा-भाईंदर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.
