भाईंदर :- दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या संपूर्ण मार्गावर अतिवेगाने मेट्रो चालवण्याची चाचणी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.तसेच सर्व स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आल्याने डिसेंबरनंतर मेट्रोचा उर्वरित मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मिरा भाईंदरमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गिका ९ उभारण्यात आली आहे. या मार्गिकेचा दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता.

या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे ३३ हजार प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. सध्या काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांची उभारणी, विद्युत यंत्रणा आणि अन्य तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी काशिगाव ते सुभाष चंद्र बोस स्थानकादरम्यान मेट्रोची प्राथमिक चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता संपूर्ण मार्गावर अतिवेगाने मेट्रो चालवून चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.

या चाचणीमध्ये मेट्रोची वेगमर्यादा, वेग वाढवण्याची क्षमता, आपत्कालीन परिस्थितीत ब्रेकची कार्यक्षमता तसेच वेगाने धावताना निर्माण होणारी कंपने आणि त्यांचा आसपासच्या परिसरावर होणारा परिणाम तपासण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे या चाचणीदरम्यान एकाच वेळी तीन मेट्रो गाड्या मार्गावर चालवण्यात आल्या. यामध्ये गाड्यांमधील संपर्क यंत्रणा, सुरक्षित अंतर राखण्याची क्षमता, स्थानकांवर गाड्यांचे आगमन आणि निर्गमन तसेच सिग्नल यंत्रणेतील समन्वयाची तपासणी करण्यात आली.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेली ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने मेट्रोच्या उर्वरित मार्गावरील सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. दरम्यान, उर्वरित स्थानकांची कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या सुरक्षिततेसंदर्भातील आवश्यक तपासण्या आणि परवानग्यांची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमधील नागरिकांना मुंबईकडे प्रवास करण्यासाठी आणखी एक जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.

डिसेंबर पर्यंतचे उद्देश :-

दहिसर मिरा-भाईंदर मेट्रो मार्गीकीचे काम जलद गतीने सुरू आहे. साधारण नोव्हेंबर महिन्यात या सेवेचे लोकार्पण करून डिसेंबर पर्यंत प्रवाशांसाठी ही खुली करण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार काम देखील सुरू असून लवकरच याबाबत सकारात्मक माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.