भाईंदर –दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेमधील दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या प्रवासाला हिरवा कंदील देण्यासाठी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, यातील काशिगाव मेट्रो स्थानकाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून भाजप आमदारांच्या खासगी जागेचा वाद कायम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या स्थानकाचे ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ च्या उभारणीचे काम एमएमआरडीए प्राधिकरणाने साधारण सात वर्षांपूर्वी हाती घेतले होते. सध्याच्या स्थितीनुसार या कामाचे दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान असे दोन टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दहिसर ते काशिगाव या मार्गिकेला हिरवा कंदील दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काशिगाव मेट्रो स्थानकावर उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी उद्घाटनाची तारीख विविध कारणांमुळे दोन वेळा बदलण्यात आली होती. मात्र उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली असतानाही मेट्रो स्थानकाचे काम अद्याप अर्धवट असल्याचे समोर आले आहे. स्थानकाच्या एका बाजूला असलेले जिने अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे जिने ज्या जागेवर उतरवण्यात येणार आहेत, त्या जागेवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अधूनमधून सुरू असलेले जिन्याचे काम सध्या थांबले असून मुख्यमंत्री अर्धवट स्थानकाचे उद्घाटन करण्यास येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नेमका वाद काय ?

मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ अंतर्गत काशिगाव मेट्रो स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या बांधकामासाठी लागणारी जागा ‘सेवेन इलेव्हेन’ या आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या मालकीची आहे. ही जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात सेवा रस्त्यासाठी आरक्षित आहे. २०२२ मध्ये महापालिकेने विकास हक्क प्रमाणपत्राच्या (TDR) आधारे ही जागा ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र कंपनीने त्यास सहमती दर्शवली नाही आणि चालू बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक बोजा येण्याची शक्यता निर्माण झाली.

या वादामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात बदल करून जिन्याचे स्थान जवळील नाल्यावर हलवले होते. परंतु कंपनीने त्या नाल्यावरील सुमारे १३३ मीटर जागाही आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आणि तेथील काम मागील वर्षभरापासून थांबले. यानंतर जिन्यासाठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने मेहता यांच्या कंपनीला विकास हक्क प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली. मात्र कंपनीने त्यालाही नकार देत बाजारभावानुसार थेट रोख रकमेची मागणी कायम ठेवली.

दरम्यान, १४ मे २०२५ रोजी मेट्रो चाचणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरा भाईंदरमध्ये आले होते. त्यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना या परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर क्रेडिट नोट किंवा अन्य पर्यायी मार्गाने जागा हस्तांतरित करून काम सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मेहता यांनी सांगितले होते. त्यानंतर प्रत्यक्ष जिन्याच्या उभारणीचे काम सुरू झाले होते. मात्र काही काम झाल्यानंतर ते पुन्हा थांबले असल्याचे समोर आले आहे.सध्या हे काम नेमके कोणत्या कारणामुळे थांबवण्यात आले आहे, याबाबत एमएमआरडीएचे अधिकारी स्पष्ट भूमिका मांडण्यास टाळाटाळ करत आहेत. तर नरेंद्र मेहता यांनीही यासंदर्भात आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.