भाईंदर :- मिरा-भाईंदरकरांची मेट्रोची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. मेट्रो मार्गिका ९ च्या उर्वरित कामाची मंगळवारी महापौर डिंपल मेहता यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. यावेळी मेट्रो मार्ग डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होऊन सेवा सुरू होईल, असा दावा महापौरांनी केला आहे. मिरा-भाईंदरमधील मेट्रो मार्गिका ९ चा दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा एप्रिलमध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे ३३ हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करतात.

सध्या काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. स्थानकांची उभारणी, विद्युत यंत्रणा आणि अन्य तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मंगळवारी झालेल्या पाहणीदरम्यान आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मेट्रो मार्गिकेच्या कामाचा आढावा घेतला. डिसेंबरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करून मेट्रो सेवा सुरू करण्याचा दावा यावेळी करण्यात आला.