भाईंदर : मिरा भाईंदरमधील मेट्रो मार्गिकेचे उर्वरित काम अंतिम टप्प्यात असताना स्थानकांजवळ वाहनतळ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
मिरा भाईंदरमधील नागरिकांना मुंबईच्या दिशेने प्रवास करणे सोयीचे व्हावे, यासाठी मेट्रो मार्गिका ९ उभारण्यात आली आहे. दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे ३३ हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या उर्वरित टप्प्याची चाचणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
मात्र, मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचे वाहन वापरणाऱ्या प्रवाशांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी भाईंदर पश्चिम येथील मॅक्सस मॉलजवळयेथे तळमजल्याखाली वाहनतळ आणि त्यावर मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएमार्फत राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राधास्वामी सत्संग रस्ता मेट्रो स्थानकाजवळही वाहनतळ उभारण्याची सूचना करण्यात आली आहे.
या दोन्ही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पुरेशा क्षमतेचे वाहनतळ उभारण्यासाठी एमएमआरडीएशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर स्थानक परिसरात वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने आधीच वाहनतळाचे नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
