भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात रविवारी झालेल्या तुफानी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मेट्रो-९ प्रकल्पातील निर्माणाधीन नानासाहेब धर्माधिकारी (दीपक हॉस्पिटल) मेट्रो स्थानकावरील काही लोखंडी पत्रे उडाल्याची घटना घडली. ही घटना शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा दहिसर ते काशिगावदरम्यान सुरू करण्यात आला असून, काशिगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका व स्थानकांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या टप्प्यातील नानासाहेब धर्माधिकारी (दीपक हॉस्पिटल) मेट्रो स्थानकाचे बांधकाम सुरू आहे.
रविवारी दुपारनंतर शहरात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा वेग वाढला. त्यावेळी स्थानकावरील काही लोखंडी पत्रे उडून खाली पडली. घटना घडली त्या वेळी रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ होती. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वादळी वाऱ्याचा अंदाज असतानाही सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का, तसेच बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. उडालेली पत्रे हटविण्यात आली असून, पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
