भाईंदर :- दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदर शहरात गेल्या महिनाभरापासून टॅक्सी सेवा देखील सुरू झाल्याचे चित्र आहे. मात्र या टॅक्सींकडून शेअर पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याने रिक्षा संघटनांकडून त्यावर आक्षेप नोंदवला जात आहे.
दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशिगाव दरम्यानची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिनाभरात जवळपास दहा लाख प्रवाशांनी या मेट्रोने प्रवास केल्याचे समोर आले आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता मिरा-भाईंदरमधील काशिगाव मेट्रो स्थानकाखाली रिक्षाचालकांसोबतच टॅक्सी गाड्याही उभ्या राहत आहेत.
प्रामुख्याने मिरा-भाईंदर शहरात टॅक्सी चालकांना परवाने देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईत मिळालेल्या मुक्त परवान्यांच्या आधारे या गाड्या येथे चालवल्या जात आहेत. काशिगावपर्यंतच मेट्रो सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांना पुढे गोल्डन नेस्टपर्यंत सोडण्याचे काम टॅक्सी चालक करत आहेत. यासाठी नव्याने शेअर भाडे पद्धत सुरू करण्यात आली आहे. मात्र अचानक टॅक्सीमधून प्रवासी प्रवास करू लागल्याने स्थानिक रिक्षाचालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या टॅक्सी वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालक संघटनांकडून करण्यात आली आहे.
गर्दीचाही त्रास : दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही मेट्रो मिरा-भाईंदरच्या काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंतच येत असल्याने सर्व प्रवासी याच ठिकाणी उतरतात. त्यामुळे मेट्रो आल्यानंतर स्थानकाखाली मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रिक्षा व टॅक्सी तत्काळ उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील आता या ठिकाणी निर्माण होऊ लागली आहे.
