भाईंदर : मिरा भाईंदरमधील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने मिनी क्लस्टर योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या भूखंडांवरील इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरविकास विभागाने ३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यानुसार एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत नवीन नियम १०.७.६ समाविष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी समूह पुनर्विकासासाठी किमान १० हजार चौरस मीटर क्षेत्राची अट होती. ती आता २,५०० चौरस मीटर करण्यात आली आहे. तसेच, किमान पाच धोकादायक इमारती एकत्र येण्याची अट कमी करून तीन इमारतींवर आणण्यात आली आहे.

रस्त्याच्या रुंदीची अटही १८ मीटरवरून १२ मीटर करण्यात आली आहे.भाईंदर पश्चिम येथील राणी सती मार्गावरील पाच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित होता. या इमारतींमधील १७८ कुटुंबांना सुरक्षित निवासाची प्रतीक्षा होती. या प्रश्नावर रहिवाशांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी नियमांमधील जाचक अटी कमी करण्याची मागणी केली होती. १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे.