लोकसत्ता प्रतिनिधी
भाईंदर :- जगभरात चर्चेत आलेल्या मिरा-भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलाबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो योग्य असल्याचे सांगत त्याची पाठराखण केली आहे. तसेच भविष्यात या पुलाच्या रचनेत काही बदलही करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या रचनेवरून यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. चार मार्गिकांचा असलेला हा पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांमध्ये कमी होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला होता. या रचनेवरून एमएमआरडीएवर जोरदार टीका करण्यात आली होती.वाद वाढल्यानंतर प्राधिकरणाने पूल योग्य असून भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा केला होता. तसेच याबाबत अधिकृत भूमिका आणि पत्रकही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले होते. तरीही नागरिकांचे समाधान झाले नव्हते.
दरम्यान, आता या पुलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले स्पष्टीकरण दिले आहे. पुलाच्या रचनेवरून वाद निर्माण झाल्यानंतर आपण स्वतः एमएमआरडीएकडून सविस्तर माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पुलाच्या अर्धवट रचनेचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करून त्याची बदनामी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, पुलाची रचना योग्य असून ती भविष्यातील गरज लक्षात घेऊन करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः ज्या ठिकाणी हा पूल उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी जागेची अडचण असल्याने त्याचे स्वरूप असे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी मोहम्मद अली रोड परिसरातही जागेच्या अडचणीमुळे वाकडे-तिकडे पूल बांधण्यात आले आहेत, असे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की, या पुलाच्या रचनेतही पुढील काळात काही बदल दिसून येतील. तसेच पुलावर अपघात होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
