भाईंदर: मिरा-भाईंदर शहरात एमएमआरडीएने उभारलेल्या पुलाखालील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. भविष्यात अपघात व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर मेट्रोसह एमएमआरडीए प्राधिकरणाने तीन उड्डाणपूल उभारले आहेत. यातील दोन पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून एका पुलाचे काम अद्यापही प्रलंबित आहे.
दीपक हॉस्पिटलच्या आधी सुरू होणारा हा पूल भाईंदर फाटकादरम्यान उतरणार आहे. मात्र या पुलाच्या रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यतः चार मार्गिकांचा असलेला हा पूल भाईंदर येथे उतरताना दोन मार्गिकांचा होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुलाच्या उभारणीवरून एमएमआरडीए प्राधिकरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी प्राधिकरणाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत. पुलाच्या रचनेत काही बदल करण्यात आले असून सुशोभीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, पुलाच्या सुरुवातीला होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. यासंदर्भात मिरा-भाईंदर महापालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने येथील रस्ता रुंद करत नाल्यावर पदपथासाठी राखीव जागेवर पक्के बांधकाम करून त्याचाही यात समावेश केला आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.
मात्र स्थानिकांचा आक्षेप
वादग्रस्त उड्डाणपुलाच्या सुरुवातीला प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाला स्थानिक नगरसेवक जय ठाकूर यांचा विरोध नसला, तरी तेथे सुरू असलेल्या कामावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने प्रवास करतात. मात्र नाल्यावर बांधकाम करताना प्रशासनाने पुरेसे भक्कम बांधकाम केलेले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
