भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये पावसाळ्यातील पहिला बळी गेल्याची घटना शुक्रवारी घडली. काही दिवसांपूर्वी अंगावर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिकेच्या धोकादायक झाडांबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राहुल पाटील (वय ३३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूर्धा गावातील रहिवासी होता. तसेच मिरा-भाईंदरचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा तो मुलगा होता.मंगळवारी राहुल पाटील दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक नारळाचे झाड त्याच्या अंगावर कोसळले. या अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

मागील आठवड्यापासून शहरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू असून अद्याप अतिवृष्टी झालेली नाही. तरीही विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. धोकादायक झाडांचे वेळेत सर्वेक्षण व छाटणी न झाल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. झाड कोसळून एका तरुणाचा बळी गेल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त केला जात असून धोकादायक झाडांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.