भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या छपाईचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने नागरिकांना विविध शासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याची तक्रार समोर आली आहे. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने संबंधित धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेकडून नागरिकांच्या जन्म व मृत्यूची नोंद करून दाखले दिले जातात. त्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाते. मात्र, महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांची छपाई दर्जेदार नसल्याने नागरिकांना त्यांचा विविध ठिकाणी वापर करताना अडचणी येत असल्याची बाब समोर आली होती. तसेच दाखल्यांमधील छापील मजकूर स्पष्ट नसल्याने तो वाचण्यासही अडचण येत असल्याची तक्रार सुशांत शेट्टी यांनी केली होती.याशिवाय प्रत्येक नागरिकाला किमान दोन प्रमाणित प्रती विनामूल्य द्याव्यात, डिजिटल स्वाक्षरीयुक्त पीडीएफ प्रत ई-मेलद्वारे उपलब्ध करून द्यावी, विभागातील रिक्त पदे भरावीत, सेवांसाठी कालमर्यादा निश्चित करावी तसेच अस्पष्ट दाखल्यांच्या बदल्यात नव्याने दर्जेदार प्रती उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्याही शेट्टी यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात केल्या होत्या.
या तक्रारीनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी सुनावणी घेऊन संबंधित कामाचा आढावा घेतला. दाखल्यांवरील छपाई स्पष्ट व दर्जेदार असल्याची खात्री करूनच नागरिकांना दाखले द्यावेत, अशा सक्त सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या. तसेच इतर मागण्यांच्या अनुषंगाने नवीन धोरण निश्चित करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
