भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये जवळपास चार महिन्यांपूर्वी महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत त्यापैकी केवळ ५ इमारतींवरच कारवाई करण्यात आल्याने शेकडो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील ३० वर्षांहून जुन्या अथवा मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. तसेच जुन्या इमारतींना नोटिसा बजावून त्यांचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यानुसार, यावर्षी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात ३८ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले होते. तसेच ३६ इमारती रिकाम्या करून त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून, ३४४ इमारतींना दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल एप्रिल महिन्यात प्रसिद्ध करण्यात आला होता.
प्रामुख्याने पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारतींचे भाग कोसळण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी अशा इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र, पावसाळ्याचा निम्मा कालावधी उलटूनही ३८ पैकी केवळ ५ इमारतींवरच प्रशासनाने कारवाई केल्याचे समोर आले आहे. नुकतीच भिवंडी येथे धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींवरही वेळेत कारवाई न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने धोकादायक इमारतींवरील कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून, मागील आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील तर रविवारी उत्तन येथील एका इमारतीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी दिली.
न्यायालयीन अडथळे :
अतिधोकादायक इमारती वेळेत पाडल्या नाहीत, तर पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा इमारती पाडण्याची प्रक्रिया महापालिकेकडून राबविली जात आहे. मात्र, अनेक इमारतींतील रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास तयार नसल्याने, तसेच काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे प्रशासनास कारवाई करताना अडथळे निर्माण होत आहेत.
आयुक्तांकडून समजूत :
मिरा-भाईंदरमधील अतिधोकादायक श्रेणीतील अनेक इमारतींमधील नागरिक बेघर होण्याच्या भीतीने इमारती रिकाम्या करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांची समजूत घालण्यासाठी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा स्वतः स्थळ पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत आहेत.
