भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा सन २०२६-२७ साठीचा १ हजार ४३९ कोटींचा अर्थसंकल्प १५ कोटी २२ लाखांच्या शिल्लकीसह मंगळवारी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांच्यासमोर सादर केला. मागील वर्षी एकत्रित सादर करण्यात आलेला एकूण अर्थसंकल्प जवळपास २ हजार ६९४ कोटी इतका होता. तर, यंदा अर्थसंकल्पातून वगळण्यात आलेला २ हजार ५७६ कोटी शासन निधी, कर्ज आणि महानगरपालिका निधी मिळून ४ हजार ४८१ कोटी इतका एकूण अर्थसंकल्प झाला असून गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार ७८७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच फुगवलेल्या आकड्यांशिवाय मूळ रकमेचा अर्थसंकल्प महापालिकेकडून सादर करण्यात आला असल्याची चर्चा रंगली आहे. या अर्थसंकल्पात विविध कामे व शहर विकासाच्या दृष्टीने विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

अशा आहेत तरतुदी….

बांधकामासाठी २४३ कोटींची तरतूद

मिरा भाईंदर शहरात विविध स्वरूपाच्या वास्तूंची निर्मिती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २४३ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यात शासन अनुदान आणि कर्ज स्वरूपात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा समावेश आहे. यातून प्रामुख्याने पूरमुक्त शहर यंत्रणा उभारणे, स्मार्ट रोड उभारणे, पर्जन्यजल वाहिन्या, सिमेंट रस्त्यांची उभारणी, मालमत्तेची देखभाल-दुरुस्ती आणि इतर कामे मार्गी लावण्याचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी आठशे कोटी इतकी तरतूद असताना यात तीन पट वाढ करण्यात आली आहे.

शिक्षण विभागासाठी ३५ कोटी

मिरा भाईंदर महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रशासनाने विशेष धोरण तयार केले आहे. यात निधीची कमतरता भासू नये म्हणून सामाजिक दायित्व निधी स्वीकारण्याचा मार्ग देखील मोकळा केला आहे.याशिवाय यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, सकस आहार देणे, नवी शैक्षणिक तंत्रप्रणाली उभारणे आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण विभागासाठी एकूण ३५ कोटी २८ लाख रुपये खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर महापालिका शाळेत बहुतांश गोष्टींची उभारणी करण्यात आल्यामुळे मागील वर्षी ५७ कोटी तरतूद असलेल्या निधीत घट करून ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी ७ कोटी

मिरा भाईंदरमधील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून महापालिकेने स्वतंत्र पर्यावरण विभागाची स्थापना केली आहे. या विभागाद्वारे पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जनजागृती करणे, महापालिकेचा नियमित पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करणे, विविध उपक्रमातून निर्माण होणाऱ्या कार्बन क्रेडिटचे मूल्यांकन करून आर्थिक उत्पन्न प्राप्त करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यासाठी यंदा ७ कोटी ७० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अपंग व समाजकल्याण योजना

मिरा भाईंदर शहरात समाजकल्याण योजना राबवण्यासाठी व अपंग नागरिकांच्या मदतीसाठी अर्थसंकल्पात यंदा २८ कोटी ४४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून दिव्यांगांना पेन्शन योजना, शिष्यवृत्ती, लग्नकार्यासाठी आर्थिक मदत, नवे विरंगुळा केंद्र, महिला रोजगार केंद्र आणि पथविक्रेत्यांना कर्ज देण्यासारख्या योजनांचा समावेश आहे.याशिवाय दुर्बल घटकला मदत करण्यासाठी स्वतंत्र २८ कोटी ची तरतूद करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागाला भरीव तरतूद

मिरा भाईंदर शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी सूर्या प्रकल्प योजना राबवली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत शहरात केले जाणारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करून मलवाहिनी अंथरणे आणि मलनिस्सारण केंद्र सुरू करण्यासाठी खर्च व कर्ज स्वरूपात मिळणाऱ्या निधीची एकूण ४५८ कोटी रुपयांची तरतूद पाणीपुरवठा विभागासाठी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

घनकचरा प्रकल्पाला अधिक प्राधान्य

मिरा भाईंदर शहराच्या दैनंदिन साफसफाईसाठी अर्थसंकल्पात २१४ कोटी २९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय घनकचरा प्रकल्प येथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया, लिचेटवरील प्रक्रिया, बायोमायनिंग आणि बायोगॅस प्रकल्पाचे शिल्लक राहिलेले काम पूर्ण करून त्या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ५० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

वैद्यकीय विभागाच्या निधीला कात्री

मिरा भाईंदर शहरात नागरिकांवर प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र आणि ‘आपला दवाखाना’ केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी नवे म्हणून प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.याशिवाय नवीन पालिका रुग्णालय आणि जुन्या रुग्णालयाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात ६० कोटी ५३ लाखांची तरतूद वैद्यकीय आरोग्य विभागासाठी करण्यात आली आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यात १० कोटींची घट करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील नवीन बाबी….

आधुनिक डिजिटल यंत्रणा उभारण्यावर भर :

मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल यंत्रणा उभारण्याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये स्मार्ट एंट्री सिस्टीम, स्मार्ट केबिन, स्मार्ट स्ट्रीट फर्निचर, स्मार्ट पेमेंट सिस्टीम, डिजिटल फलक, स्मार्ट सिग्नल यंत्रणा, स्मार्ट पाणी वितरण व्यवस्था, एआय आधारित स्मार्ट कचरा मॉनिटरिंग सिस्टीम आणि इतर आधुनिक डिजिटल यंत्रणा उभारण्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

पूरमुक्त शहर उभारण्यावर भर :

मिरा भाईंदर शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे यातून कायमची मुक्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात वारंवार पाणी भरणाऱ्या भागात पंपिंग स्टेशन उभारणे, पाण्याचा विसर्ग होण्याच्या ठिकाणी तांत्रिक दरवाजे बसवणे, पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सेन्सर बसवणे आणि शहराची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी मॅपिंग करण्यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

जमीन सुधारणा

मिरा भाईंदर शहरात असलेल्या पडीक जमिनी पुन्हा वापरा योग्य करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये बायोमायनिंग प्रक्रिया करून शहरी जंगल, सोलर पार्क आणि मनोरंजनासाठी हरित क्षेत्र उभे करण्याचा प्रशासनाने यंदा नव्याने संकल्प केला आहे.

महिला लखपती योजना

मिरा भाईंदर शहरात आतापर्यंत नऊपैकी सात महापौर महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे महिलांचे शहरातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या महिला लखपती योजनेचा विस्तार करून त्याचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने योजना आखली आहे.

उद्यानात बदल

मिरा भाईंदर शहराला उद्यानांचे शहर म्हणून संबोधले जाते. त्यामुळे आगामी काळात उभारण्यात येणारी उद्याने अधिक आकर्षक करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले आहे. यात आता ही उद्याने दिव्यांगांच्या प्रवेशासाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने रचना केली जाणार आहे. यात ओपन जिम व वेलनेस झोन देखील उभारण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.