भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा सन २०२६-२७ साठीचा १ हजार ४३९ कोटींचा अर्थसंकल्प १५ कोटी २२ लाखांच्या शिल्लकीसह मंगळवारी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांच्यासमोर सादर केला. मागील वर्षी एकत्रित सादर करण्यात आलेला एकूण अर्थसंकल्प जवळपास २ हजार ६९४ कोटी इतका होता.

तर, यंदा अर्थसंकल्पातून वगळण्यात आलेला २ हजार ५७६ कोटी शासन निधी, कर्ज आणि महानगरपालिका निधी मिळून ४ हजार ४८१ कोटी इतका एकूण अर्थसंकल्प झाला असून गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार ७८७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच फुगवलेल्या आकड्यांशिवाय मूळ रकमेचा अर्थसंकल्प महापालिकेकडून सादर करण्यात आला असल्याची चर्चा रंगली आहे.

मागील सलग तीन वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे कोणत्याही चर्चेविना प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प मंजूर होत होता. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुका पार पडल्यापासून लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा प्रशासनाने हा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला असून त्यावर सविस्तर चर्चा करून यास १६ मार्च रोजी महासभेत अंतिम मान्यता दिली जाणार आहे.

प्रामुख्याने मागील तीन वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना शासनाकडून जवळपास २ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचा दावा स्थानिक आमदारांकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात यातील ७० टक्के निधी प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. परिणामी या खर्चावरून राजकारण पेटू नये म्हणून सरसकट शासन निधी वगळून यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्कल प्रशासनाने लढवली आहे.

दरम्यान अर्थसंकल्प सादर करत असताना कोणत्याही प्रकारची करवाढ लादण्यात आलेली नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र नवीन मालमत्ता धारकांना नव्या दरानुसार कर आकारणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे करवाढीसह हा अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा प्रामुख्याने प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या नागरी सेवा पारदर्शक आणि सुखकर करणे, शासकीय कार्यालये डिजिटल करणे, पूरमुक्त शहर उभारणे, सूर्या प्रकल्प पाणी योजनेचे काम पूर्ण करणे, घनकचरा प्रकल्पावर सुविधा उभारणे यांसारख्या कामांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. तर वैद्यकीय विभाग, वृक्ष प्राधिकरण, पर्यटन व शिक्षण विभागात नवी व जुनी कामे पूर्ण करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

मात्र आस्थापनेवरील वाढलेला ताण कमी करणे, अनधिकृत बांधकाम आटोक्यात आणणे, आणि उत्पन्न वाढवण्याच्या समस्येबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे दिसून आले.

कोट :

“मिरा भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तवता व शिस्त, नागरी पायाभूत सुविधा, भविष्यासाठी तयार शहर आणि शाश्वत स्वच्छतेचा निर्धार या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडेल, असा मला विश्वास आहे.”