भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या नामकरण समितीने महासभेकडे पाठविला आहे. त्यामुळे या सभागृहाचे नामकरण ‘माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार सभागृह’ असे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका क्षेत्रातील विविध रस्ते, चौक आणि वास्तूंच्या नामकरणासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नामकरण समितीने विचार केला. त्यामध्ये महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध रस्ते, चौक, उद्याने, वाचनालये आणि आरोग्य केंद्रांच्या नामकरणाचे प्रस्तावही समितीने मंजूर करून महासभेच्या मान्यतेसाठी पाठविले आहेत. त्यामध्ये भाईंदर पूर्व येथील ‘बॉम्बे मार्केट’ बस थांब्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस थांबा, छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील ब्रह्मदेव मंदिरासमोरील उद्यानाला ब्रह्मदेव उद्यान, तसेच काही चौकांना विविध महापुरुषांची नावे देण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
या नामकरण प्रस्तावांबाबत विचारविनिमय होऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महासभेच्या मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे. महासभेच्या निर्णयानंतर प्रस्तावित नामकरणाला अंतिम स्वरूप मिळणार आहे.
फाटकला आगरी भवन बस थांबा नाव
भाईंदर पूर्व येथील फाटक रोड येथे स्थानिक आगरी समाजाचे आगरी भवन उभारण्यात येत आहे. यासाठी महापालिकेकडून जमीन देण्यात आली असली तरी सभागृह उभारणीचा खर्च हा आगरी समाज करत आहे. दरम्यान सभागृह उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच आता या समोरील मार्गाला आगरी भवन बस थांबा देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे.
