भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळांसाठी कंत्राटी पद्धतीने ३० शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोमवारी पालिका मुख्यालयात थेट मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्याच दिवशी ५८ उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली.
मिरा भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सहा शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचा माध्यमिक विभाग सुरू असून विद्यार्थ्यांच्या वाढत्या पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता भासत आहे. शासनाकडून शिक्षक उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने ३० शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली होती.
या भरती प्रक्रियेअंतर्गत सोमवारी पालिका मुख्यालयात थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपाट्टे यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. पहिल्या दिवशी ५८ उमेदवारांनी मुलाखत दिली. मुलाखत प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची निवड करून लवकरच त्यांना सेवेत रुजू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.दरमहा ३५ हजार रुपये मानधनावर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी वार्षिक सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
गणित, विज्ञानसह क्रीडा शिक्षकांची नियुक्ती
या भरती प्रक्रियेत गणित, विज्ञान, मराठी, समाजशास्त्र, उर्दू आणि इंग्रजी विषयांसाठी २५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी पाच क्रीडा शिक्षकांचीही नियुक्ती केली जाणार आहे. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू केले जाणार आहे.
