भाईंदर :- राज्यातील विविध तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शहरातील विकासक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि नागरिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर डिंपल मेहता यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा, अन्नधान्याची उपलब्धता, शेतीवरील आर्थिक संकट तसेच रोजगाराच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शहरातील विविध घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन महापौर डिंपल मेहता यांनी केले आहे.
यासाठी महापौर सहाय्यता निधीत जमा होणारी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे. नगरसेवकांनी आपले एका महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या बैठकीस आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेते रवी व्यास, विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद हुसैन, गटनेते जय ठाकूर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
