भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरात महापालिकेने उभारलेल्या फुटबॉल टर्फच्या वापराचे धोरण अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे मैदान वापरास मिळत नसल्याने फुटबॉलप्रेमी तरुणांची मोठी गैरसोय होत आहे.
मिरा-भाईंदर शहरातील तरुणांना क्रिकेटप्रमाणे फुटबॉलचाही आनंद घेता यावा, यासाठी शहरात चार ठिकाणी आर्टिफिशियल फुटबॉल टर्फची उभारणी महापालिकेने केली आहे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागणी केल्यानंतर शासनाने यासाठी महापालिकेला विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार गोल्डन नेस्ट, रामदेव पार्क मैदान, सुभाषचंद्र बोस मैदान आणि सचिन तेंडुलकर मैदान येथे हे टर्फ उभारण्यात आले आहेत.
प्रामुख्याने शहरातील फुटबॉलप्रेमी तरुणांना हक्काचे मैदान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे टर्फ उभारण्यात आले असून त्यांचे उद्घाटनही करण्यात आले आहे. मात्र उद्घाटनाला काही महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही वापराचे धोरण अद्यापही महापालिकेने निश्चित केलेले नाही. परिणामी ही मैदाने प्रत्यक्ष खेळासाठी उपलब्ध होत नाहीत. काही ठिकाणी मुले याचा वापर करत असली, तरी सुरक्षारक्षकांकडून त्यांना अडवले जात आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमी तरुणांमध्ये नाराजी पसरली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापराचे धोरण निश्चित झाले नसल्याचे सांगण्यात येत असून, आता लवकरच याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांनी दिली आहे.
धोरण तयार करताना पेच
मिरा-भाईंदर महापालिकेने उभारलेल्या टर्फच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च येण्याची शक्यता आहे. मैदानात बसवलेले कृत्रिम गवत खराब झाल्यास ते वेळोवेळी दुरुस्त करणेही आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे हे काम कंत्राटदाराच्या हाती दिल्यास तो यासाठी मोठ्या खर्चाची मागणी प्रशासनाकडे करू शकतो.हा खर्च भरून काढण्यासाठी खेळाडूंवर शुल्क आकारण्याची गरज भासू शकते. मात्र त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची भीती असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

