भाईंदर: मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभा त्याग करून सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र, शिवसेनेच्या मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने या आंदोलनाला साथ न देता सभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. त्यामुळे महासभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये एकमत झाल्याचे चित्र दिसून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने ९५ पैकी ७८ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे १३, शिवसेनेचे तीन आणि भाजप समर्थक एका अपक्ष नगरसेवकाची निवड झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे संख्याबळ कमी असल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र येत ‘मिरा भाईंदर विकास आघाडी’ हा गट स्थापन केला आहे. मागील चार महासभांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे विरोधकांची भूमिका मांडताना दिसून आले होते.मात्र, मंगळवारी झालेल्या तहकूब महासभेत या आघाडीतच मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले. महासभेत विषय चर्चेसाठी आल्यानंतर त्यावर मत मांडण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केला. याबाबत नाराजी व्यक्त करत त्या आपल्या जागेवर उभ्या राहिल्या. महासभेचे कामकाज सुरू असताना त्या उभ्या राहिल्याने महापौर डिंपल मेहता यांनी त्यांना जागेवर बसण्यास सांगितले. मात्र, बगाजी यांनी त्यास नकार दिल्याने दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला.

त्यानंतर शिवसेनेच्या तिन्ही नगरसेवकांनी सभा त्याग करून सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर मत मांडण्याची संधी सत्ताधारी पक्षाकडून दिली जात नसून, कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी घाई केली जात असल्याचा आरोप बगाजी यांनी केला. सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसेल, तर लोकशाही मार्गाने विरोध करण्यासाठी सभागृहाबाहेर आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.शर्मिला बगाजी प्रत्येक विषयावर मत मांडण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना प्रत्येक वेळी बोलण्याची संधी देता येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर डिंपल मेहता यांनी दिले.

शिवसेनेचे नगरसेवक सभागृहाबाहेर आंदोलन करत असतानाही महासभेचे कामकाज सुरूच राहिले. विशेष म्हणजे, मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या आंदोलनाला सभागृहातही ठोस पाठिंबा दिला नाही. तसेच शिवसेनेला बोलण्याची संधी का दिली जात नाही, याबाबत काँग्रेसकडून महापौरांना जाब विचारण्यात आला नाही. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या ‘मिरा भाईंदर विकास आघाडी’तील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महासभेत काँग्रेस आणि भाजपचे एकमत झाल्याची चर्चा रंगली.

दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक बराच वेळ सभागृहाबाहेर आंदोलन करत राहिल्यानंतर विरोधी पक्षाचे गटनेते जय ठाकूर यांनी महापौरांकडे विनंती करून शिवसेनेच्या नगरसेवकांना पुन्हा सभागृहात घेण्याची मागणी केल्याचे सांगितले.