भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयाला सोमवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत पहिल्या मजल्यावरील आरोग्य विभागातील फाईल्स आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भाईंदर पश्चिम येथे मिरा भाईंदर महापालिकेचे मुख्यालय आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील आरोग्य विभागाच्या कार्यालयात अचानक आग लागली. सकाळची वेळ असल्याने कार्यालयात कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे आगीची माहिती सुरुवातीला समजू शकली नाही. काही वेळातच आगीचा धूर परिसरात पसरल्यानंतर मुख्यालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणेत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत कार्यालयातील फाईल्स, कागदपत्रे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तसेच विद्युत यंत्रणेची तपासणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पाहणी केली जात आहे.
दरम्यान, महापालिका मुख्यालयात आग नियंत्रणासाठी विविध यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष आग लागल्यानंतर या यंत्रणांचा प्रभावी वापर झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अग्निसुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही अशा घटना घडत असल्याने महापालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
