भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयातील विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नामफलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकांवर मराठी अक्षरांचा चुकीचा वापर झाल्याने महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाईंदर पश्चिम येथे मिरा भाईंदर महानगरपालिकेचे मुख्यालय आहे. या इमारतीच्या मध्यभागी मुख्य प्रवेशद्वार असून दोन्ही बाजूंना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र जिने आहेत. हे जिने नागरिकांच्या सहज लक्षात यावेत यासाठी नुकतेच त्यांच्या बाहेर नामफलक लावण्यात आले आहेत.

मात्र, यापैकी एका फलकावर ‘ए विंग’ असे लिहिताना ‘ए’ या अक्षराऐवजी ‘अ’ चुकीच्या पद्धतीने अक्षर लिहिण्यात आल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, लिहिलेले अक्षरही व्याकरणदृष्ट्या योग्य नसल्याने या फलकाचा नेमका उच्चार काय करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिरा भाईंदर शहरात मराठी भाषेच्या वापरावरून सातत्याने वाद निर्माण होत असताना महापालिकेच्या मुख्यालयातील नामफलकावरच मराठी लेखनाची अशी चूक झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फलक तयार करताना त्याची तपासणी करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या चुकीच्या फलकाबाबत मराठीप्रेमी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे आक्षेप नोंदवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. संबंधित फलक लवकरच दुरुस्त करण्यात येणार असून चुकीचा फलक लावणाऱ्या संबंधितांकडून त्याचा खर्च वसूल केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.