भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेने उभारलेल्या बाजारांमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून दररोज २३० रुपये बाजार शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव शुल्काला फेरीवाल्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
शहरात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून, अनेक ठिकाणी रस्ते अडवून व्यवसाय केला जात असल्याने वाहतूक कोंडीसह विविध समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुमारे सहा वर्षांपूर्वी महापालिकेने मोकळ्या जागांवर तसेच मोठ्या नाल्यांवर स्लॅब टाकून बाजार उभारले. मिरा रोड येथील मंगलनगर आणि रामदेव पार्क परिसरात बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर कंत्राटदारामार्फत ही बाजारपेठ उभारण्यात आली.
या बाजारांमध्ये फेरीवाल्यांना बसवून कंत्राटदाराकडून शुल्क वसुली केली जात होती. मात्र दोन वर्षांपूर्वी कंत्राटाची मुदत संपल्यानंतर हे बाजार महापालिकेच्या ताब्यात आले. त्यानंतर उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी ८० रुपये असलेले दैनिक शुल्क थेट २३० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.दरम्यान, शहरातील रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून महापालिका अजूनही ८० ते ११० रुपये शुल्क वसूल करते. त्यामुळे बाजारात नियमाने बसणाऱ्या फेरीवाल्यांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी निर्णय?
महापालिकेने बीओटी तत्त्वावर बाजार उभारून स्वतःचा खर्च टाळला, असा आरोप केला जात आहे. कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतरही वाढीव शुल्कातील सुमारे १०० रुपये कंत्राटदाराला दिले जाणार असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका निला सोन्स यांनी केला आहे. हा निर्णय चुकीचा असून तो मागे घेण्याची विनंती महापौरांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावर अंतिम निर्णय आयुक्त घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या बाजार विभागाकडून देण्यात आली आहे.
