भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकाची महासभा सुरू असताना अचानक महापौरांनी पत्रकारांना चित्रीकरण करण्यास मनाई केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. बहुमताचा गैरफायदा घेत भाजपकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महापालिकेची तहकूब महासभा शुक्रवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती. शिल्लक राहिलेल्या विषयांवर चर्चा सुरू असताना विषयपत्रिकेवर मिरा भाईंदर शहराच्या समूह विकास योजना रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या विषयावर विरोधी पक्षनेते आक्षेप नोंदवत होते. त्यावेळी पत्रकार गॅलरीत बसलेले पत्रकार कामकाजाचे चित्रीकरण करत होते. मात्र अचानक महापौरांनी पत्रकारांना चित्रीकरण करण्यास मनाई केली. त्यामुळे पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नियमानुसार महासभा सुरू असताना चित्रीकरणास परवानगी द्यायची की नाही, याचा अधिकार महापौरांकडे असतो. तसेच चित्रीकरणासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले जाते. मात्र मागील चोवीस वर्षांपासून आजपर्यंत या नियमाची महापालिकेत काटेकोर अंमलबजावणी झालेली नव्हती. महासभा सुरू झाल्यानंतर सुमारे एक तासाने अचानक महापौरांनी चित्रीकरणास बंदी घालण्यात आल्याने हा वाद उभा राहिला. यात पत्रकारांना थांबवण्यासाठी थेट सुरक्षा रक्षकांना पाठवण्यात आले.

प्रामुख्याने पत्रकार हे नागरीकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्यासाठी कामकाजाचे चित्रीकरण करीत असतात. मात्र चित्रीकरणाबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्ट प्रक्रिया न राबवता अचानक घेतलेल्या निर्णयाचा व्हिडिओ पत्रकारांनी विरोध केला. पत्रकारांना रोखल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील विरोधी गट मिरा भाईंदर विकास आघाडी यांनीही आक्षेप नोंदवला. तसेच भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनीदेखील सभागृहात मत व्यक्त करत, पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपने पत्रकारांना रोखणे योग्य नसल्याचे सांगितले.दरम्यान, महापौर डिंपल मेहता यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

“महासभेचे कामकाज विनापरवानगी थेट प्रक्षेपित करणे चुकीचे आहे. यासाठी सुलभ प्रक्रिया निश्चित करण्याची योजना आखली जात आहे. त्या अनुषंगाने केवळ आजचे प्रक्षेपण रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या- डिंपल मेहता -महापौर (मिरा भाईंदर महानगरपालिका)