भाईंदर :-नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.ही निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी येणाऱ्या खर्चास महासभेने मान्यता देऊन ठराव मंजूर केला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ३६ शाळा आहेत. यात जवळपास साडेनऊ हजार प्रामुख्याने महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सामान्य कुटूंबातील व गरजु समाजातील जीवन जगणाऱ्या पालकांची असल्याने त्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकास करण्याकरिता पालिकेकडून अधिक भर दिला जातो. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते.

त्यानुसार या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाते.ह्या वस्तु शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करणे अपेक्षित असते.मात्र मागच्या अनेक वर्षापासून विविध कारणास्तव विलंबाने विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्याचे वाटप पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.त्यामुळे हा मुद्दा दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडतो.

यंदा ही अडचण उद्भवू नये म्हणून वेळेपूर्वीच सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.त्यानुसार आगामी २०२६-२७ आणि २०२७-२८अशा दोन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येत १० टक्के वाढ गृहीत धरून विद्यार्थी गणवेश व साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जवळपास अडीच कोटीच्या खर्चास मान्यता देणारा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे.