भाईंदर : मिरा भाईंदर शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत नव्या गृहसंकुलांना नळ जोडण्या न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने कायम ठेवला आहे. त्यामुळे नव्या इमारतींना नळ जोडणीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मिरा-भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून दररोज सुमारे २१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेता उपलब्ध पाणी अपुरे पडत आहे.त्यात पाणी टंचाई काळात परिस्थिती अजून भीषण होत आहे.या पार्श्वभूमीवर शहराला सूर्या प्रकल्पाचे किंवा अन्य स्रोतांमधून अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत नव्या इमारतींना नळ जोडणी देऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला होता.

मात्र, हा ठराव मंजूर झाल्यानंतरही पाणीकपात लागू असलेल्या कालावधीत काही नव्या इमारतींना नळ जोडण्या देण्यात आल्याचा मुद्दा भाजप नगरसेवक भगवती शर्मा यांनी ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या महासभेत उपस्थित केला होता. यावेळी काही इमारतींना जोडण्या दिल्या जात असताना इतर इमारतींना मात्र ठरावाचे कारण देत नकार दिला जात असल्याची तक्रारही नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे महासभेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. स्थायी समितीचे सभापती हसमुख गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली या समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे गटनेते, सभागृह नेते तसेच वरिष्ठ नगरसेवकांचा समावेश केला जाणार आहे. समितीचा अहवाल महासभेत सादर केल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान यंदा राज्यात दुष्काळ जाहिर करण्यात आल्यामुळे सध्या शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. तसेच आठवड्यातील दोन दिवस हा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे शहरात पाणीटंचाईची तीव्र समस्या जाणवत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी नव्या नळ जोडण्यांना पाणी न देण्याचाच निर्णय कायम असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद पाटील यांनी दिली.