भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात विविध विकासकामांमुळे बाधित होणारी ४० जुनी झाडे मुळासह काढण्याबाबत महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे. या प्रस्तावाबाबत हरकती व सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना ४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मिरा-भाईंदर शहरात सध्या विविध खाजगी तसेच शासकीय विकासकामे सुरू आहेत.

त्यामध्ये इमारतींचे बांधकाम, रस्त्यांचे रुंदीकरण आदी कामांचा समावेश आहे. या विकासकामांच्या आड येणारी तसेच धोकादायक ठरणारी झाडे मुळासह काढण्यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ मधील तरतुदींनुसार ही नोटीस जारी करण्यात आली असून, शहरातील १ ते १८ वर्षे वयोगटातील झाडे काढण्याचा प्रस्ताव आहे. यात बदाम, जांभूळ, पिंपळ, अशोक, सुबाभूळ, कांचन आणि गुलमोहर आदी वृक्षांचा समावेश आहे.

या संदर्भात महापालिकेचे उद्यान अधीक्षक नागेश विरकर यांनी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे. झाडे काढण्यासंदर्भात उद्यान विभागाने प्राथमिक संमती दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या प्रस्तावावर आक्षेप असलेल्या नागरिकांना पुढील सात दिवसांत महापालिकेच्या उद्यान विभागाकडे हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत विविध विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाकडून हजारो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

आमदारांच्या संस्थेकडून मागणी

मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या ‘सेव्हन इलेव्हन’ संस्थेकडून २० झाडे तोडण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार भाईंदर येथील सर्वे क्रमांक ५२५/३, ५२७/१, ५२७/३, ५३५ आणि ५३६ या जागेवरील झाडे काढण्याबाबत महापालिकेने सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे.