भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध करून देणारी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, शुल्क ऑनलाइन भरणे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करणे ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करता येणार आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी या डिजिटल सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, शहर अभियंता दिपक खांबित, सिस्टम मॅनेजर राज घरत यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. या सुविधेमुळे नागरिकांना जन्म-मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. अर्जापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने वेळ आणि खर्चाची बचत होणार असून, सेवेमध्ये अधिक पारदर्शकता व गती येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. महानगरपालिका नागरिकांना अधिक कार्यक्षम, डिजिटल आणि लोकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, भविष्यातही अशा सुविधा वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
गणेश मंडळांना देखील ऑनलाईन परवानगी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याची ऑनलाइन सुविधाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. या पोर्टलद्वारे गणेश मंडळांना अर्ज ऑनलाइन सादर करता येणार असून, परवानगी प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि वेळेची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामुळे मंडळांना पालिकेच्या कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही.
