भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या नगरसेविका तथा मिरा भाईंदर विकास आघाडीच्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांची महासभेकडून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सभागृहनेतेपदी भाजपचे नगरसेवक रवि व्यास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या. यात भाजपने ९५ पैकी ७८ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर काँग्रेसचे १३ आणि शिवसेनेचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान, महापालिकेत विरोधकांचे संख्याबळ कमी असल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत ‘मिरा भाईंदर विकास आघाडी’ची स्थापना करून आपला गट नोंदवला आहे.

त्यानुसार, मागील तीन महिन्यांपासून महापौर डिंपल मेहता यांच्या उपस्थितीत महासभेचे कामकाज सुरू होते. दरम्यान, महापालिकेत विविध विभागांच्या समित्या स्थापन झाल्यानंतरही सभागृहात विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते या महत्त्वाच्या पदांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. या अधिकारांबाबत महापौरांवर आक्षेपही नोंदवण्यात येत होते.

अखेर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या चौथ्या महासभेत विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेते पदांच्या निवडीचा ठराव मांडण्यात आला. त्यानुसार नगरसेविका सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांची विरोधी पक्षनेतेपदी, तर रवि व्यास यांची सभागृहनेतेपदी निवड करण्यात आली.