भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या मेट्रो उड्डाणपुलाखालील परिसर सुरक्षित करण्यासाठी बांबूची भिंत उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पुलाच्या सौंदर्यीकरणात भर पडून नैसर्गिक समतोल राखला जाईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मिरा भाईंदर शहराच्या मुख्य मार्गावर काशिमीरा ते गोल्डन चौकापर्यंत मेट्रो मार्गिकेखाली तीन उड्डाणपुलांची उभारणी एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. यापैकी दोन पूल वापरासाठी खुले करण्यात आले असून, एका पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेल्या पुलाखालील मार्ग मोकळा करून तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
मात्र, मागील काही महिन्यापासून या पुलाखाली बेघर नागरिकांनी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरू लागले आहे. याशिवाय भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात उद्यान उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांसाठी खेळण्यांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या नागरिकांना बाहेरील वाहनांचा त्रास होऊ नये तसेच उद्यानाच्या सुरक्षेत भर पडावी, या हेतूने दोन्ही बाजूंनी बांबूची भिंत उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतल्याची माहिती दिली आहे.
बांबूच्या आवरणाचा फायदा काय?
मिरा भाईंदरच्या मार्गांवर उड्डाणपुलाखाली बांबूचे आवरण असलेली भिंत उभारल्यास मुख्य रस्ता आणि उद्यान यामध्ये स्पष्ट विभाजन होईल. शिवाय हे पर्यावरणपूरक पाऊल ठरेल. यामुळे ऑक्सिजननिर्मितीला चालना मिळेल तसेच शहराच्या सुशोभीकरणात मोठी भर पडेल, असे शर्मा यांनी
सांगितले.
१८ कोटींचा खर्च
दोन उड्डाणपुलांखाली उभारण्यात येणाऱ्या उद्यानासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. यापैकी ७० टक्के खर्च शासन अनुदानातून तर ३० टक्के खर्च महापालिका निधीतून केला जाणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एन. के. ब्रदर्स या संस्थेची निवड करण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

