भाईंदर :-मिरा भाईंदरकरांनी चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर दिलेल्या मुदतीत म्हणजेच जुलै अखेरीस पर्यंत भरल्यास त्यांना तीन ते पाच टक्क्यां पर्यंतची सवलत मिळणार आहे.याबाबतचा निर्णय नुकताच पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून ही योजना प्रशासनाकडून राबवली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदाही ती लागू करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर पालिका आर्थिक संकटात सापडली आहे. निधी अभावी कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके रखडली असून दैनंदिन खर्च भागवणे ही कठीण होत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत विकास कामांवर अधिक खर्च करणे व इतर त्यामागील करणे आहेत. मात्र, उत्पन्नाचे मालमत्ता कर हे एकमात्र प्रशासनाकडे साधन आहे. त्यामुळे बिघडलेली आर्थिक घडी मालमत्ता करातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून रुळावर आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
नव्या आर्थिक वर्षाचे एप्रिल किंवा मे महिन्यात मालमत्ता देयके वाटप करण्यास सुरुवात केली जाते. हा कर जुलै अखेरीस पर्यंत भरला जाणे अपेक्षित आहे. त्यानूसार काही जणांकडून कर भरणा केला जातो. तर, अधिक तर जण कर भरणा करण्याकडे पाठ फिरवतात. परिणामी तिजोरीत निधी नसल्याने आर्थिक अडचणींना प्रशासनाला सामोरे जावे लागते. म्हणून, कर वसुलीला अधिक गतीने व मुदतीत कर भरणा करणाऱ्यांना प्रामाणिक मालमत्ता धारकांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने कर सवलत योजना गेल्या काही वर्षांपासून राबवली जात आहे.
यामुळे जुलै अखेरीस पर्यंत शंभर कोटींचा कर वसूल करण्यात गेल्या काही वर्षात प्रशासनाला यश येत आहे. म्हणून, चालू २०२६-२७ या आर्थिक वर्षात ही कर सवलत योजना लागू करण्याचा निर्णय पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नुकताच घेतला आहे. या योजने अंतर्गत ३० जून पर्यंत कर भरल्यास पाच टक्के ,तर ३१ जुलै पर्यंत कर भरणा केल्यास तीन टक्के इतकी मुळ करावर नागरिकांना सवलत मिळणार आहे. या सवलत योजनेचा लाभ देत, जुलै अखेरीस २०० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहेत.
