भाईंदर :-मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी आलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याला बसने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान हे मंगळवारी महापालिकेत आले होते. त्यावेळी मिरा-भाईंदरमधील विविध संघटनांशी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयात गर्दी केली होती. प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.परिस्थिती चिघळू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच रोखले होते.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच काशीमिरा परिसरात कार्यरत असलेल्या आशा सहाणे (४२) या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या पायावरून मुख्य प्रवेशद्वाराबाहेरून जाणारी बस गेली. बसच्या चाकात पाय अडकल्याने त्या काही अंतर फरफटत गेल्याची माहिती उपस्थितांनी दिली.या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मिरा रोड येथील ऑरबीट हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.