भाईंदर :-उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी शाळांची घंटा वाजताच विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत केले. मात्र, मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात किंवा घरगुती कपड्यांमध्येच शाळेत यावे लागल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळा आहेत.यात जवळपास दरवर्षी जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रामुख्याने पालिका शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे समाजातील गरजू कुटुंबातून येतात. त्यामुळे या विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी पालिकेवर असते. दरम्यान सोमवार पासूनच नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. खाजगी शाळांमधील विद्यार्थी नवीन गणवेश, बॅग आणि शैक्षणिक साहित्य घेऊन शाळेत दाखल झाले असताना पालिका शाळांमधील चित्र मात्र वेगळे होते. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे अपेक्षित असतानाही यंदाही त्यात विलंब झाल्याचे दिसून आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रांगोळ्या, फुगे आणि पताकांनी सजावट करण्यात आली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी पालकांनीही मुलांना शाळेत सोडण्यासाठी उपस्थिती लावली होती. नव्या वातावरणामुळे काही चिमुकल्यांना रडू कोसळल्याने त्यांची समजूत काढताना शिक्षकांची तारांबळ उडाली.

दरम्यान, पालिका शाळांमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण महापौर डिंपल मेहता, आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, गणवेश वाटपाचा प्रश्न कायम राहिल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

आयुक्ताच्या इशाऱ्याचे काय झाले?

पालिका शाळांमधील गणवेश वाटपातील दिरंगाई लक्षात घेऊन आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मे महिन्यातच शिक्षण विभागाला निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शाळा सुरू होण्याच्या किमान दहा दिवस आधी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश दिले होते. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. आता गणवेश उपलब्ध असूनही त्याचे वाटप झाले नसल्याचे सांगितले जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.