भाईंदर :-नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळा असून, त्यामध्ये दरवर्षी सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी समाजातील गरजू कुटुंबांतील असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेवर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच रेनकोट व इतर आवश्यक वस्तू महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते.

यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. मात्र, शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले नव्हते. विधान परिषद निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता तसेच कंत्राटदार निवड प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईमुळे ही परिस्थिती उद्भवली होती. परिणामी, विद्यार्थी मागील काही दिवस शैक्षणिक साहित्याविना शिक्षण घेत होते.

याबाबत तक्रारी समोर आल्यानंतर महापालिकेने प्रक्रिया गतिमान करत मंगळवारी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या नव्या ई-क्लासरूमसह इतर आधुनिक सुविधांची पूर्तताही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महापौर डिंपल मेहता आणि महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात दिली.